मजेदार कविता

चिऊ ताई चा डायनिंग टेबल

चिऊ ताईला एकदा वाटलं
घ्यावं एक डायनिंग टेबल

पिल्लांना खाऊ घालावं
अन लगेच बाजारात जावं

छान सुंदर डायनिंग टेबल
घराची शोभा पण वाढवेल

चिऊताई होती विचारात गढलेली
मनाने तर कधीच दुकाणात पोहचलेली

कुठला घ्यावा बरे? सनमायकाचा
की घ्यावा छान काचेचा? की मेटलचा?

चिऊताईने पिल्लांना पटापटा भरवले
डायनिंग टेबल साठी चिमनोबांना पटवले

दोघे जेव्हा फर्निचरच्या दुकाणात पोहचले
सारे फर्निचर पाहून तर चिऊ ताईचे डोळे दिपले

एक छानसा डायनिंग टेबल चिऊ ताईने निवडला
चिमनोबांना तर 'होम मिनिस्टर' ला दुजोरा द्यावाच लागला

गणपती बाप्पाशी गप्पा

नमस्कार माझा गणपती राया
का म्हणतात बरे तुला मोरया

तू किती आहेस मोठा
तुझे वाहन उंदीर किती छोटा

खरे तर तू माझे ऐक
तुझे वाहन बदलून टाक

पृथ्वीवर आहेत किती तरी मॉडेल
तुला यातील एक नक्कीच आवडेल

तू खातोस त्यातला मला दे ना एक लाडू
मी देईन तुला पाणी प्यायला छान छान गडू

देवात सर्वात मोठा तुझाच मान
करतात सारे तुझेच गुणगान

माझा राग नको येऊ देऊ गणपत्ती बाप्पा
मला आवडतात फक्त मारायला गप्पा

झंप्याची मावशी

झंप्याची मावशी

आहे मोठी आळशी

काम काही करत नाही

पलंगावरुन उतरत नाही

हिला सारखे खायला लागते

अबब किती 'ही' खात असते

जेव्हा वाटते आता खाल्ले खूप

पलंगावरच घेते छान झोप

घेते जेव्हा अळोखे पिळोखे

अंगाखालून निघतात झुरुळे

एकदातर गंमतच झाली

अशीच होती सुस्तावलेली

स्वप्नात आले तिच्या रागवलेले

म्हणे ब्रम्हदेव खूपच चिडलेले

रागात त्यांनी तिला दिले ढकलून

जागी ती झाली भिऊन खडबडून

त्या दिवसापासून ती खुपच सुधरली

आज्जीच्या प्रत्येक कामात मदत करु लागली

आणि आता,

बिच्चारा कावळा

कावळ्याने लावली
'लव्हली अ‍ॅण्ड लव्हली'

म्हणाला होणार मी गोरा-गोरापान
दुसर्‍यांन सारखा दिसणार छान !

म्हणतात ना मला काळा काळा
बघा, हंस आता झाला कावळा

दात घासेन खोलगेट खॅंसिगर्डनी
मॅक्वागार्ड मधले पीनार पाणी

होईल माझा गोड गळा
मला लाजेल कोकीळा

केली साबन फीक्स
लावीन फक्त टक्स

पॅंट घालीन टफ अ‍ॅण्ड टफ
पावडर लावायला मॉन्संसचा पफ

कावळा आता फार बदलला
पण त्यावर असरच नाही झाला

मग कावळा खूप-खूप रडला
साधेच रहाण्याचा निश्चय केला

माकडाची फजिती

एकदा माकड लिफ्ट मधे शिरले
पटापटा सारे बटणं त्याने दाबले

दार लागले,लिफ्ट आता सुरु झाली
आधी वर मग खाली येऊ लागली

माकडाचे पोट बघा कसे होत होते
वर जाताना खाली अन खाली येताना वर होते

माकडाला काहीच सुचेना, बघा कशी मजा
दारही आतुन बंद मिळाली चांगलीच सजा

लिफ्ट थांबली , दारही उघडले
आतले माकड बाहेर फेकले गेले

माकडाला आली चक्कर दिसले दिवसा तारे
चिमण्या, कावळे, कबुतर डोळ्यापुढे फिरले

कधी नाही खोडी करणार, माकडाणे हो ठरवले
कशी फजीती झाली, आता माकड शहाणे झाले

पाली गं पाली

पाली गं पाली येऊ नको खाली
घाबरलेली श्वेता घामाने न्हाली

पाल जशी जशी खाली येऊ लागली
श्वेता पण तशी तशी दूर पळू लागली

पालीला बघून श्वेता असली घाबरली
म्हणते कशी 'वाचव मला विठू माऊली'

पळून पळून श्वेताची दमछाक हो झाली
दमुन भागुन श्वेता निद्रेधिन झाली / झोपी गेली

जाग आली जेव्हा, श्वेता पालीला शोधू लागली
आता कुठे ही पाल गेली? दिसेनाशीच झाली ?

पाली गं पाली, पाली गं पाली

गोर्‍या गोमट्या पालीने

गोर्‍या गोमट्या पालीने
मारली पटकण उडी
तीला घाबरली श्वेता
झाली पटकण खडी

करू नको चेष्टा बाई
सगळे पालीला म्हणाले
घाबरलेल्या श्वेताची
समजूत घालू लागले

समजूत घातली जरी
मनातून होते सारे घाबरलेले
पण उगाचच धिटाईने पालीला
शूक - शूक करु लागले

पालच ती ऐकणार कसली
ती जागेवरुन पण नाही हलली
पुन्हा कोणी तरी शूक केले
मग ती खाली खाली येऊ लागली

भिंती वरच्या पालीने
गंमतच बाई केली
सारे जण भितीने
रुम सोडून पळाली